0
वैशिष्ट्य :डाळिंब म्हणजे सर्जनचे प्रतिक, भरभराटीचा, वैभवाचा संकेत. ईश्वराचा प्रेषित महंमदयाने आपल्या अनुयायांना डाळिंब भक्षण करण्याचा सल्ला दिला होता, कारण त्यामुळे सैतान लांब राहतो.पारशी समाजात डाळिंबाच्या फांद्यांपासून पवित्र झाडू तयार करतात. त्यांच्या व्रतबंध समारंभात डाळिंबाच्या दाण्याच्या अक्षदा उधळतात. त्यामुळे दृष्ट शक्ती दूर होतात अशी मिथीका आहे. अंतिम घटका मोजणाऱ्याच्या मुखात डाळिंबाचा रस घालतात.सर्वसाधारण वर्णन :डाळिंबाचे झाड हे एक छोटेखानी गोलाकार झुडूप असते. डाळींबाचा वृक्ष ३ ते ५ मीटर उंचीचा, धुरकट तांबड्या रंगाचा बुंधा असलेला असतो. त्याच्या निमुळत्या कडक फांद्याअनुकूचिदार असतात. बुंधा / खोड उभे, तांबूस तपकिरी असते. नंतर ते राखाडी होते. त्याचे काही वाण सदाहरित तर काही पानगळी प्रकारचे आहेत. पाने काहीशी झुबक्यांनी येतात. ती आकाराने ५ ते ७ सें. मी. लांब, काहीशी भाल्यासारखी, अरुंद, चकचकीत आणि चिवट असतात. कोवळी पालवी तांबूस हिरवी असते. पण पाने जरा जून होताना हा रंग गडद होत जातो.डाळींबाच्या फुलाची कळी म्हणजेच अनारकली. लालसर छटा असेलेली भगवी/शेंदरी फूले चांगली मोठी असून ती फांद्यांच्या टोकाशी येतात.फळे गडद लाल रंगाची, सुमारे ५ सें. मी. व्यासाची असतात. यात लाल रंगाचे पाणीदार व गोड दाणे असतात. साल कठीण व जाड असते. फळात अनेक बिया असतात. प्रत्येक बी भोवती तांबूस तजेलदार मांसल आवरण असते. फळ परिपक्व झाले की ते हसते म्हणजेच उकलते. डाळिंबाची फळे खातात. बिया सुकवून त्यापासून मसाला करतात.औषधी उपयोग :झाडाचा प्रत्येक भाग म्हणजे डाळींबाच्या फळातील दाण्यांचा रस, फळाची ओली अथवा वाळलेली साल, फूले आणि मूळ यांचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. डाळिंब हे फळ पित्तशामक आहे. याची साल नुसती तोडात ठेवली तरी खोकला आटोक्यात राहतो. उष्णतेच्या विकारांवर डाळिंब अतिशय उपयुक्त आहे. अग्नी दीपन करणे, पचन सुधारणे, व अतिसाराचानाश करणे हे त्याचे प्रमुख गुण असून गळ्याचे विकार, मुख रोग, तृष्णा, दाह, ज्वर व अतिसार या रोगांचे ते नाशक असते. डाळींबाच्या सालीत तुरट रसामुळे सूज कमी करणे, जंतूनाशक, जखम शुद्ध करून ती भरून आणणे हे गुण असतात. लाकडाचा उपयोग शेतीची अवजारे करण्यासाठी होतो.

Post a Comment

Random Post

 
Top