0

पुणे शहरातील उल्हास भालचंद्र पानसरे हे पुणे महानगर परिवहन लिमिटेड कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे सासरे रमेश रामचंद्र राजगुरू यांना वयोमानामुळे शेती करणे शक्य होत नव्हते. शेती पडीक राहत होती. त्यातच पावसाचे प्रमाणही कमी होत असल्याने शेती करताना अडचणी येत होत्या. पाऊस आणि विहिरीला असलेल्या पाण्यावर काेरडवाहू पीकलागवडीवर त्यांचा भर होता. शेती पडून राहण्यापेक्षा त्यातून काहीतरी उत्पन्न मिळेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उल्हास पानसरे यांनी गेल्या चार वर्षांपासून रमेश राजगुरू यांच्या आंबळे (ता. पुरंदर, जि. पुणे) गावातील शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. एकूण सात एकर क्षेत्रापैकी दीड एकर क्षेत्रावर त्यांनी सीताफळ बाग विकसितकेली. पाण्याचे नियोजन करत फळपिकांच्या बरोबरीने इतरही पिके घेण्यात पानसरे यांना यश आले. त्यांनी विहिरीवरून अडीच हजार फूट पाइपलाइन करून संपूर्ण सात एकर क्षेत्राला पाणीपुरवठा केला आहे. शेतामध्ये घरही बांधल्याने आवश्यकतेनुसार राहण्याची सोय झाली.अडचणींवर केली मातउल्हास पानसरे हे पीएमपीएलमध्ये प्रवासी तक्रार निवारण विभागात कार्यरत आहेत. वडिलांची शेती नसल्याने त्यांना शेती करण्याचा अनुभव नव्हता. सासरे रमेश राजगुरू यांचीशेती विकसित करायचे ठरविल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पीक लागवडीचा अभ्यास सुरू केला. परिसरातील शेतकरी तसेच फळबाग तज्ज्ञांचा सल्ला घेतला. शेती व्यवस्थापन करणे सोपे जाण्यासाठी गावपरिसरातील अंकुश कुंजीर यांच्याबरोबरीने अर्धेलीने त्यांनी पीक लागवडीचे नियोजन बसविले, त्यामुळे शेतीकडे लक्ष राहते. दोघांच्यामध्ये खर्च आणि उत्पन्न वाटून घेतले जाते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पानसरे यांनी सन २०११ मध्ये दीड एकर क्षेत्रावर सीताफळ लागवडीचे नियोजन केले. जून महिन्यात १५ फूट बाय १५ फूट अंतरावर योग्य आकाराचे खड्डे घेऊन शेणखत, मातीच्या मिश्रणाने भरून बाळानगरी जातीच्या रोपांची लागवड केली. लागवडीच्यावेळी कमी उंचीची रोपे मिळाल्याने जगविण्याचे जिकिरीचे काम करावे लागले. शेतीमध्ये पीक लागवडीचे प्रयोग करत असताना सीताफळाबरोबरच इतर फळझाडे लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मजुरांची कमतरता असल्यामुळे दर शनिवार, रविवारी आणि सुटीच्या दिवशी अधिकाधिक वेळ शेतीमध्ये देत पानसरे यांनी कामाचे नियोजन केले. सासू, सासऱ्यांचे मार्गदर्शन आणि पत्नी सौ. भारती यांची साथ यामुळे शेती विकास करण्याचे मनोबल वाढले.ठिबक सिंचनाच्या वापरातून पाणीबचतपठारावर असलेल्या आंबळे गावात गेली तीन वर्षे अपुरा पाऊस पडत आहे, त्यामुळे या भागात शेतीला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पुरंदर पाणी उपसा योजनेमुळे शिवारात पाणी खेळते, त्यामुळे कशीबशी एक-दोन पिके घेता येतात. पानसरे यांना एक विहीर आणि कूपनलिकेमधून उपलब्ध होणाऱ्या पाण्यातून पिकांसाठी पाणी नियोजन करावे लागते. सध्या पानसरे यांच्या बागेत सीताफळाची २०० झाडे, आंबा ८५ कलमे, लिंबू २० झाडे, ईडलिंबू ५ झाडे, चिकू १० कलमे, पेरू १० कलमे, जांभळाची १० झाडे आहेत. सीताफळ बागेच्या कडेने त्यांनी पेरू, जांभूळ आणि चिकूची एक ओळ लावली आहे. लागवडीसाठी पानसरे यांनी पेरूची सरदार, जांभळाची बहाडोली, चिकूची कालीपत्ती आणि आंब्याची केसर, तोतापुरी, हापूस याजातींची निवड आहे. पानसरे यांच्या शेतात आंब्याची जुनी ३५ कलमे होती. सन २०१५मध्ये त्यांनी नव्याने ५० कलमांची लागवड केली. सर्व फळझाडांना पानसरे यांनी ठिबक सिंचन केले आहे. त्यातून शिल्लक राहणाऱ्या पाण्यातून पाच एकर क्षेत्रावर हंगामनिहाय गहू, हरभरा, कांदा, लसूण, भुईमूग, रब्बी ज्वारी, चाऱ्यासाठी मका या पिकांच्या लागवडीचे नियोजन केले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी टाकी बांधली असून, त्यात कूपनलिकेचे पाणी सोडले आहे. गरज पडल्यास कूपनलिका आणि टाकीतूनही फळझाडांना पाणी दिले जाते. शेतीलाअधिकाधिक पाणी मिळावे यासाठी शेततळ्याचे नियोजन त्यांनी केले. सध्या वीज भारनियमनाचा प्रश्न असल्याने वेळापत्रकानुसार काहीवेळा रात्री किंवा दिवसा पाणी देण्याचे नियोजन करावे लागते.फळबागेचे व्यवस्थापन ःपीक व्यवस्थापनाबाबत पानसरे म्हणाले, की फळझाडांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता शेतखत आणि लेंडी खताचा वापर करतो. माझ्या बरोबरीने काम करणारे अंकुश कुंजीर यांच्याकडे दोन गाई, आठ शेळ्या आणि २२ मेंढ्या आहेत. जनावरांचे शेण आणि लेंडीपासून सेंद्रिय खत तयार करतो. सीताफळाची बाग यंदा प्रथमच बहरली. दीड एकर क्षेत्रावरील सीताफळाच्या बागेतून चारशे किलो फळांचे उत्पादन मिळाले. सरासरी प्रतवारीनुसार ४० ते ९० रुपये किलो दर मिळाला. फळांची विक्री पुणे बाजारपेठेत केली जाते. खर्च वजा जाता पहिल्या वर्षी वीस हजार रुपये मिळाले. बागेतील केसर, हापूस, तोतापुरी आंब्याच्या कलमांनाही यंदा फळे लागली. यंदा कलमांच्यापासून १० डझन आंबे मिळाले. आंबे घरी आणि नातेवाईकांना वाटले. गेल्या वर्षी एक एकरात ३० क्विंटल कांदा मिळाला. कांदा विक्रीतून ४५ हजार मिळाले. तसेच तीन एकराच्या पट्टीत हरभरा एक क्विंटल, रब्बी ज्वारीचे पाच क्विंटल,गहू पाच क्विंटल, भुईमूग तीन क्विंटल उत्पादन मिळाले. यंदा शेतात, ज्वारी, कांदा, हरभरा, जनावरांसाठी चारा म्हणून मका पीक घेतले आहे. पुढील काळात डाळिंब आणि शेवगा लागवडीचा विचार आहे. पिकांवरील कीड, रोग नियंत्रणासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना केल्या जातात. शेती करण्यात खूप आनंद मिळतो, त्यामुळे मिळेल तेवढा वेळ शेतीसाठी देतो. पगारातील काही रक्कम शेती विकासासाठी गुंतवितो.

Post a Comment

Random Post

 
Top