मुंबई: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम यांच्या मालकीची इमारत विकत घेण्यासाठी लिलावात भाग घेणाऱ्या माजी पत्रकाराला दाऊदचा हस्तक छोटा शकीलकडून धमकी देण्यात आल्याचे या पत्रकाराने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. मात्र याबाबत अद्याप पोलिसांना माहिती दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दाऊदच्या मुंबईतील ७ मिळकती अंमली पदार्थांची तस्करी, विदेशी मालाचे तस्करी आणि विदेशी चलनाचे गैरव्यवहार या गुन्ह्यांसाठी जप्त करण्यात आली आहे. त्यांचा लिलाव दि. ९ डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.
जप्त करण्यात आलेल्या मिळकतीमधील पाकमोडीया स्ट्रीटवरील एका इमारतीच्या लिलावात माजी पत्रकार बालकृष्णन हे सहभागी होणार आहेत. ते देशसेवा समिती या स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधित्व करीत असून या जागेत उपेक्षित बालकांना इंग्रजी भाषेचे आणि संगणकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे; असे त्यांनी सांगितले. या इमारतीची राखीव किंमत १ कोटी अठरा लाख रुपये ठरविण्यात आली आहे.
या लिलावात सहभागी होत असल्याबद्दल आपल्याला शकील याच्याकडून एसएमएस आला. ‘तुम्ही लिलावात भाग घेणार आहात. मात्र त्यामुळे तुमचे काय होईल; याची तुम्हाला जाणीव आहे का; असे आपल्याला या एसएमएसद्वारे विचारण्यात आले. मात्र ही त्यांची शैली आहे. आपण मात्र लिलावात सहभागी होण्यावर ठाम आहोत; असे बालकृष्णन यांनी सांगितले.
Post a Comment