आजचा शेती सल्ला:जनावरांची व गोठ्याची स्वछता
गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरे आणि गोठ्यातील स्वच्छतेमुळे परजीवींचा प्रादुर्भाव नियंत्रित राहतो. जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
* गोचिड आपली अंडी गोठ्यातील गव्हाणी, कपारीमध्ये घालतात. या जागेची स्वच्छता करावी. गोचिडाची अंडी गोळा करून गोठ्याच्या बाहेर शेकोटीमध्ये जाळून टाकावीत. हा उपाय आठवड्याच्या अंतराने तीन वेळेस प्रत्येक हंगामामध्ये करावा. यामुळेकमी खर्चात गोचिड निर्मूलन करता येते.
* जनावरांना चावणाऱ्या पिसवा आपला जीवनक्रम गोठ्यातील जाळे, जळमटे यांमध्ये पूर्ण करतात. गोठ्याची स्वच्छता केल्याने त्यांचे जीवनचक्र तुटते, त्यामुळे गोठ्यात पिसवांचा प्रादुर्भाव कमी होतो.
* जनावरांच्या शरीराची स्वच्छता करावी. उवा त्यांची अंडी जनावरांच्या केसावर घालतात. हे लक्षात घेऊन ठराविक काळानंतर म्हशी भादराव्यात. घोड्यांना खरारा करावा. मेंढ्यांची योग्य काळात लोकर कापावी. जनावरांच्या शरीराची स्वच्छता ठेवावी.
* जनावरांना खरजेचा प्रादुर्भाव झाला असेल तर ती जनावरे गोठ्यातील खरबडीत जागेवर शरीर घासतात. त्या वेळेस त्यांची अंडी तिथे पडतात. या अंड्यांचा इतर निरोगी जनावरांना स्पर्श झाल्यास खरजेचा झपाट्याने प्रसार होतो. त्याचे वेळीच नियंत्रण करा.
* घरगुती माशी, स्टेबल फ्लाय, लापरोझिया, हिप्पोबोस्का या माश्या शेण, मलमूत्र यामध्येच अंडी घालून जीवनचक्र पूर्ण करतात. गोठ्यात पडलेले शेण, मलमूत्र व मूत्राने व्याप्त चारा उचलून शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये कुजवल्यास या कीटकांचे जीवनचक्र पूर्ण होत नाही. परिणामी त्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
* गाय, म्हैस विशेषतः शेळी, मेंढीमध्ये आंत्रकृमीची लागण झाल्यास कृमीची अंडी शेणाद्वारा बाहेर पडतात. हे लक्षात घेऊन गोठ्यामध्ये शेणाचा ढीग न ठेवता गोठा स्वच्छ करून गोठ्यापासून लांब ढिगाऱ्यामध्ये शेण कुजवल्यास कृमीची अंडी नष्ट होतात,त्यामुळे जनावरांतील आंत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविणे शक्य होते. जंतनाशक पाजण्यावरील खर्च, वेळ वाचविता येतो.
* लहान वयातील करडे व वासरे यांना आयमेरिया या आदिजीवीची लागण होते. मातीमध्ये त्यांची अंडी असतात. वासरे, करडांनी ही माती चाटल्यास ती त्यांच्या पोट्यात जातात. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी. ओलसर जागेवर सातत्याने चुना भुकटीचा वापर करावा.
"अजनाळे नगरी" इंस्टॉल करा आणि मिळवा ताज्या बातम्या , कृषी वातॉ व आजचे बाजारभाव !!!यासाठी हि लिंक वापरा https://play.google.com/store/apps/details?id=com.ajanale.nagari किंवा प्ले स्टोर वर Ajanale Nagari सर्च करा.धन्यवाद.
Post a Comment