0

शरद पवार - कोल्हापुरात शेतकरी सहकारी संघाचा अमृतमहोत्सव

कोल्हापूर - खेड्यापाड्यातील माणसांना सशक्त करण्याचे काम सहकारी चळवळीने केले. वैकुंठभाई मेहता, धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने ही चळवळ बळकट केली. या लोकांमुळे सहकाराला एक वेगळी उंची मिळाली. सहकाराला सामान्य माणूस जोडला गेला. सहकारी संस्था नीट चालल्या तरच लोकांचा विश्वास या चळवळीला मिळू शकतो. शेतकरी संघाची उभारी हे त्याचे उदाहरण आहे. सहकारी चळवळीने सामान्यातल्या सामान्य लोकांनाही सामावून घेतल्यास सहकाराचा विश्वास बळकट होऊ शकेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी (ता. १८) येथे केले.येथील शेतकरी सहकारी संघाच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. पवार म्हणाले, अाशिया खंडात सवोत्कृष्ट सहकारी संघ म्हणून शेतकरी संघाची ओळख आहे. सहकारातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी हा संघ उभा केला आणि तो चालविला. जनसामान्यांत एक वेगळे स्थान मिळविले. मध्यंतरी काही घटनांमुळे संघ अडचणीत आला. आता तो समाधानकारक स्थितीत आहे. रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. तो टिकविण्याचे काम सध्याच्या संचालक मंडळापुढे आहे.सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार चळवळ वाढविण्यासाठी चांगल्या संस्थांना मदत करण्याचे शासनाचे धोरण आहे. खरंच, ज्या संस्थांना थोड्या मदतीची गरज आहे आणित्यातून ते सावरू शकतील अशी परिस्थिती आहे. त्यांना शासन निश्चितपणे मदत करेल.या वेळी संस्थेच्या वाटचालीत भरीव योगदान दिल्याबद्दल वसंतराव मोहिते यांचा सत्कार श्री. पवार यांच्या हस्ते झाला. माजी मंत्री जयंत पाटील, छत्रपती शाहू महाराज, कल्लाप्पाणा आवाडे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील, श्रीमती निवेदिता माने, पी. डी. पाटील, आमदार संध्याताई कुपेकर, आमदार सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, संजय डी. पाटील आदि या वेळी उपस्थित होते. संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर यांनी आभार मानले.

Post a Comment

Random Post

 
Top