0

नवीन बागेत री-कटची तयारी महत्त्वाची

डॉ. आर. जी. सोमकुंवर

Friday, January 21, 2011 AT 12:00 AM (IST)

Tags: agro planning,   recut,  dr.r.g.somkunwar

आता बागेत री-कट घेतल्यानंतर जी फूट निघेल, त्याकरिता आपण बागेत आपल्याला शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करणार आहोतच. हा पुरवठा सुव्यवस्थित राहावा याकरिता मुळांचा विस्तार व त्याचसोबत कार्यक्षम अशी मुळी तयार असणे महत्त्वाचे आहे.


नवीन द्राक्ष लागवड केलेल्या बागेमध्ये ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कलम करण्यात आले आहे, त्यानंतर कलमांची वाढ होऊन काडी परिपक्व झाली; परंतु मागील हंगामाचा विचार करता लक्षात येईल, की कुठल्याही बागेत कलम केलेली बाग ओलांडा तयार होऊन काड्या तयार झाल्यात अशी परिस्थिती दिसत नाही. त्याला बरीच कारणे आहेत. ती म्हणजे कलम काडीची जाडी कमी-जास्त असेल, ज्यामुळे बाग मागे-पुढे फुटली. कलम फुटण्याकरिता बराच उशीर झाला, त्यामुळे नवीन निघालेली फूट जोमात नव्हती किंवा विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे बागेत वाढच चांगली झाली नाही. या काही महत्त्वाच्या कारणांमुळे आपल्याला द्राक्ष बागेत आज री-कट घेणे महत्त्वाचे आहे. री-कट घेतल्यानंतर द्राक्ष बागेमध्ये लवकरात लवकर खोड, ओलांडा व त्यावर काड्या तयार होण्याच्या दृष्टीने काम री-कटपूर्वीची द्राक्ष बाग.  करणे गरजेचे आहे. री-कट घेण्यापूर्वी बागेत काय उपाययोजना करावी, याबद्दलची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

री-कट पूर्वतयारी : 
आपण मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात खुंट रोपांची लागवड केल्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात कलम केले. लागवडीपासून आजपर्यंत मुळांच्या भोवतील वातावरणात कुठलीही मशागत केलेली नसावी. आता बागेत री-कट घेतल्यानंतर जी फूट निघेल, त्याकरिता आपण बागेत आपल्याला शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करणार आहोतच. हा पुरवठा सुव्यवस्थित राहावा याकरिता मुळांचा विस्तार व त्याचसोबत कार्यक्षम अशी मुळी तयार असणे महत्त्वाचे आहे. असे असल्यासच जे काही अन्नद्रव्य वेलीला दिले आहे, त्याचा पुरेपूर फायदा वेलीसाठी होईल. त्याकरिता द्राक्ष बागेत आधी वेलीची परिस्थिती समजून घ्यावी. बागेत काय कमी आहे व कोणती परिस्थिती व्यवस्थित आहे, याचा सुरवातीसच अभ्यास करावा.

साधारणतः री-कट घेण्याच्या 15 दिवसांपूर्वी दोन कलमांच्या मध्ये तीन-चार इंच खोल अशी चारी घ्यावी. या चारीमध्ये जवळपास दीड ते दोन टोपली कुजलेले शेणखत टाकून त्यावर 150-200 ग्रॅम सुपर फॉस्फेट, प्रति एकरी 25-30 किलो डीएपी आणि शिफारशीत सूक्ष्म अन्नद्रव्य मिसळून ही चारी मातीच्या थराने झाकून घ्यावी. यामुळे दोन वेलीच्या मध्यात बोद तयार होईल. या बोदामध्ये हवा खेळती राहिल्यामुळे नवीन मुळी लवकर तयार होईल व ही मुळी कार्यक्षम अशी असेल. याच मुळीला पांढरी मुळी असेसुद्धा म्हणतात. अशी मुळी जमिनीत तयार झाल्यास आपण ज्या प्रकारचे खत जमिनीतून किंवा ड्रीपमधून दिले ते सहजरीत्या वेलीद्वारे उचलले जाईल. त्याचाच परिणाम म्हणजे खोड, ओलांडे व फुटींची वाढ सहजरीत्या करून घेता येईल. री-कट घेण्याच्या आठ ते दहा दिवसांपूर्वी कलम जोडाच्या वरची सात ते आठ पाने गाळून घ्यावीत. यामुळे ज्या ठिकाणी री-कट घ्यायचा आहे, त्या भागातील डोळे तापतील आणि फुगतील. अशा डोळ्यांमधून फूट लवकर निघण्यास सोपे जाते. शक्‍यतोवर कलम जोडाच्या वर सुतळीने बांबूला कलम बांधून वरची फूट खाली वाकवून घ्यावी. यामुळेसुद्धा कलम फुटण्यास मदत होत असल्याचे दिसते.

री-कटची वेळ : 
बाग फुटण्याकरिता वातावरणात विशिष्ट तापमान असणे गरजेचे असते. ठराविक तापमानामध्ये वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचाली होत असतात. वातावरणातील किमान तापमान हे 15 अंश सेल्सिअस पुढे असल्यास वेलीमध्ये सर्व बरोबर असल्याचे आपण म्हणतो. सध्या जरी बऱ्याच भागांत दिवसा फार ऊन व रात्री कमी थंडी जाणवत असेल, तरीपण आपण लवकरच री-कट घ्यायची घाई करणे हिताचे होणार नाही. पुन्हा थंडीची लाट आल्यास आपले गणित चुकू शकते. अशा वेळी बाग फुटण्यास जास्त वेळ लागेल. तेव्हा री-कट साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतला तरी काड्या तयार करता येईल.

हायड्रोजन सायनामाईडचा वापर :
री-कट घेतलेल्या बागेत एकसारखे व लवकर डोळे फुटण्याच्या दृष्टीने हायड्रोजन सायनामाईडचा वापर करणे गरजेचे आहे. काडीची जाडी, डोळ्यांची परिस्थिती व वातावरणातील तापमान या गोष्टींचा ताळमेळ बसवूनच हायड्रोजन सायनामाईडची मात्रा घ्यावी. साधारणतः या वातावरणात 30-40 मि.लि. प्रति लिटर पाण्यात हायड्रोजन सायनामाईड पुरेसे होईल.

रोगांचे नियंत्रण :
मागील हंगामात कलम केलेल्या बागेत नवीन फुटींवर विविध प्रकारचे रोग आढळून आलेत. त्यांचे वेळीच नियंत्रण करावे.

Post a Comment

Random Post

 
Top