0

थंडीमुळे द्राक्षांमध्ये दिसते पिंक बेरीज विकृती

डॉ. एस. डी. रामटेके, रवींद्र कोर

Wednesday, December 26, 2012 AT 02:30 AM (IST)

Tags: agri,   sakal,   agrowon,   cold,   graps,  

रात्र आणि दिवसाच्या तापमानातील फरक बऱ्याच वेळा कमी तापमानाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त घातक असतो. हवामानात जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट असल्यास सकाळी बऱ्याच वेळा धुके राहते. यामुळे पाने, घड बहुतेकदा ओले राहतात. असे घड प्रथम थंडीमुळे आणि त्यानंतर दुपारच्या जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. 

साधारणतः 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाचा द्राक्षांच्या वाढीवर परिणाम होतो. द्राक्षाच्या घडांवर पाऊस पडल्यास जास्त रोग व किडी येतात, काढणी केल्यानंतरही फळकूज वाढते, त्यामुळे आपल्याकडील हवामानात द्राक्ष पीक उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात घेणे योग्य ठरत नाही. आपला प्रदेश उष्ण कटिबंधात येतो. या प्रदेशातील हिवाळा हा थंड हवामान असणाऱ्या प्रदेशातील उन्हाळ्याप्रमाणे असतो. म्हणूनच आपल्याकडे द्राक्ष पीक हिवाळ्यात घेतले जाते. द्राक्षाच्या योग्य प्रकारे वाढीसाठी 15 ते 35 अंश तापमान योग्य मानले जाते; परंतु बऱ्याच वेळा थंडीच्या लाटेचा आपल्याला अनुभव येतो. मागच्या आठवड्यातील खास करून नाशिक विभागातील तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. कमाल तापमान दहा अंशपेक्षा कमी झाल्यास द्राक्षाच्या वाढीवर परिणाम होतो. बऱ्याच वेळा रात्रीचे तापमान कमी म्हणजेच दहा अंश सेल्सिअस झाल्यानंतर दुपारचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. रात्रीच्या व दिवसाच्या तापमानातील हा फरक बऱ्याच वेळा कमी तापमानाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा जास्त घातक असतो. हवामानात जास्त आर्द्रता असताना थंडीची लाट असल्यास सकाळी बऱ्याच वेळा धुके राहते, त्यामुळे पाने व घड ओले राहतात. असे घड प्रथम थंडीमुळे व त्यानंतर दुपारच्या जास्त तापमानामुळे खराब होऊ शकतात. सद्यःस्थितीत बहुतांश बागा या मण्यांची वाढ किंवा मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. सध्याच्या हवामानाचा विचार केल्यास किमान तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. साधारणपणे या थंडीचा परिणाम द्राक्षवेलीवर दृश्‍य किंवा अदृश्‍य स्वरूपात दिसून येतो. 

थंड हवामानाचा परिणाम ः 
1) मुळ्यांची वाढ मर्यादित होते किंवा नवीन मुळ्यांची निर्मिती होत नाही, त्यामुळे पाने लहान राहतात, त्यांची जाडी कमी होते, शेंड्याची वाढ पूर्णपणे थांबते. 
2) वेलीची वाढ खुंटते, खोडाची जाडी कमी होते, विस्तार मर्यादित राहतो. उन्हात आल्यामुळे द्राक्षमण्यांचा रंग (तपकिरी) बदलतो. 
3) पर्णरंध्रे बऱ्याच काळ बंद राहतात, प्रकाश संश्‍लेषण कमी होते, अन्नद्रव्यांचे वहन कमी होते, वेलीची उपासमार होते, त्यामुळे मण्यांचा आकार वाढत नाही. वाढ थांबलेली दिसून येते. परिणामी द्राक्षाच्या प्रतीवर फरक पडतो. 
4) पोटॅश, कॅल्शिअम, फॉस्फरस या अवस्थेमध्ये अत्यंत आवश्‍यक असते, ते मुळांमार्फत शोषले जात नाही. त्यामुळे त्यांच्या कमतरतेच्या विकृती द्राक्षमण्यांमध्ये दिसून येतात. 
5) सायटोकायनिनची उपलब्धता कमी होते, हरितद्रव्याचे पानांतील प्रमाण कमी होते. फेनॉलची निर्मिती वाढते, तसेच अन्थोसायनिनची मण्यांमध्ये निर्मिती होते. त्यामुळे रंगीत जातीच्या द्राक्षांना चांगला रंग प्राप्त होतो. मात्र, पांढऱ्या जातीतील द्राक्षांमध्ये पिंक बेरीसारखी विकृती दिसून येते. 
6) मण्यांत पाणी उतरण्याच्या वेळी पाणी जास्त प्रमाणात दिले असता अशा परिस्थितीमध्ये मण्यांना चिरा पडू शकतात.
7) जास्त थंडी झाल्यास रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो. 
8) थंड हवामान हे द्राक्षांसाठी बाधक आहे, त्यामुळे प्रामुख्याने पिंक बेरीज आणि द्राक्षमण्यांमध्ये चिरा पडणे यासारख्या शरीरशास्त्रीय विकृती आढळतात. 

पिंक बेरीज ः 
ही विकृती प्रामुख्याने थॉमसन सीडलेस व त्याचे क्‍लोन, जसे की तास- ए- गणेश, माणिक चमन, सोनाका इ.मध्ये आढळते. मण्यांमध्ये पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये जर कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त व किमान तापमान हे दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर द्राक्षमणी गुलाबी रंगाचे होतात. अशी परिस्थिती जास्त काळ राहिली असता सर्वच मणी गुलाबी होतात. यालाच आपण पिंक बेरी विकृती म्हणून संबोधतो. या विकृतीमुळे असे घड निर्यातीसाठी अयोग्य ठरतात. ही विकृती येऊच नये यासाठी परिणामकारक संशोधन सध्या तरी पूर्ण झालेले नाही, तरीपण काही प्रतिबंधात्मक उपाय योजना करून काही अंशाने ही विकृती येण्याचे टाळता येऊ शकते. 
उपाय योजना ः 
1) ही विकृती सर्वसाधारणपणे पाणी उतरण्याची अवस्था असणाऱ्या बागेमध्ये दिसून येते. ती टाळण्यासाठी द्राक्ष वेलीची फळछाटणी ही ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी. 
2) वेलीला पोटॅश या अन्नद्रव्याचे पोषण योग्य प्रमाणात द्यावे.
3) सायटोकायनिन या संजीवकाची मात्रा पाणी उतरण्याच्या वेळी द्यावी, ज्यामुळे मण्यांतील हरितद्रव्य टिकून राहील. 
4) पाण्याचा जास्त ताण देऊ नये. मण्यांत पाणी उतरण्यास सुरवात झाल्यानंतर वेलीवर शेडनेटचे आच्छादन घालावे किंवा घड पेपरने झाकून घ्यावेत. 
5) सेंद्रिय, गांडूळ, कंपोस्ट व हिरवळीच्या खताचा वापर करावा. सेंद्रिय पदार्थांची स्लरी द्यावी. 
6) मण्यांची विरळणी एकदा किंवा दोनदाच करावी. मण्यांना इजा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 

द्राक्ष मण्यांना चिरा पडणे ः 
ही विकृती रंगीत जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळते. ही विकृती मुख्यतः बागेत मण्यांत पाणी उतरण्याच्या अवस्थेमध्ये सापेक्ष आर्द्रता वाढल्यामुळे दिसून येते. मुळांद्वारे पाणी शोषले जाते; परंतु पानांद्वारे ते बाहेर पडत नाही, कारण वातावरणातील कमी तापमान व जास्त असणारी आर्द्रता यामुळे हे पाणी ज्यामध्ये 16 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त साखर आली आहे, अशा मण्यांमध्ये शोषले जाते, त्यामुळे मण्यांमधील दाब वाढतो. हा दाब थांबवून ठेवण्यासाठी मण्यांचा आकार वाढत नाही. परिणामी मण्यांना भेगा पडतात. अशा मण्यांतून साखर बाहेर पडते. यावर ऍस्परजिलस म्युकर, रायझोपर्स किंवा फेसोलियमसारख्या परोपजीवी बुरशी वाढतात, यामुळे मणी सडण्याची प्रक्रिया सुरू होते. 
उपाय योजना ः 
1) जास्त पाणी देण्याचे टाळावे. 2) ड्रीप्स नळी वर न लावता जमिनीपासून एक फूट उंचीवर बांधाव्यात, ज्यामुळे बागेमध्ये जास्त आर्द्रता तयार होणार नाही. 3) मण्यांची विरळणी योग्य प्रकारे करावी, जेणेकरून घड सुटसुटीत राहतील. 4) वेलीचा विस्तार मर्यादित ठेवावा, जास्तीची कॅनॉपी ठेवू नये. 5) नो टिलेज पद्धतीचा वापर करावा, जेणेकरून पाण्याचा योग्यप्रकारे निचरा होईल. 

Post a Comment

Random Post

 
Top