मुंबई, दि. ८ - डेव्हिड हेडलीच्या साक्षीमुळे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यामागील पाकिस्तानचा हात अधिक स्पष्ट होत असून याचा फायदा पाकवर जास्त दबाव टाकण्यासाठी होऊ शकतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे हेडलीची चौकशी केली. यावेळी हेडलीने पाकिस्तानच्या ISI च्या मेजर इक्बाल, मेजर अली यांची ओळख झाल्याचे सांगितले, तसेच हाफिज सईद व झकी उर रेहमान लखवी यांच्याकडून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण घेतल्याचे त्याने सांगितले.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्यांवर कारवाई करावी अशी मागणी भारत सातत्याने करत असून हेडलीच्या साक्षीनंतर भारताच्या मागणीला जास्त धार येणार आहे. हेडलीची जबानी नव्या डोसियरच्या स्वरुपात पाकिस्तानला सादर केली जाईल आणि लष्कर ए तयबा सारख्या यात गुंतलेल्या संघटनांवर कारवाईची मागणी केली जाईल अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.आज सकाळी सात ते दुपारी १२ वाजेपर्यंत निकम यांनी हेडलीची जबानी घेतली असून आत्ताशी केवळ २५ टक्केच प्रश्न विचारून झाल्याचे निकम म्हणाले. उद्या पुन्हा साक्ष नोंदवण्यात येणार असून अमेरिकेला न दिलेली माहिती हेडली भारताशी बोलताना उघड करेल अशी आशा निकम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment